१२.३०.२००९

आता नवीन वर्षात . . .

Happy New Year 2010आता आपण २००९ ला मागे टाकून २०१० मध्ये प्रवेश करतो आहोत . . . त्यामुळे प्रथम सगळ्यांना माझ्याकडून नवीन कोऱ्या वर्षासाठी शुभेच्छा देतो . . २००९ च्या काही चांगल्या आठवणी बरोबर घेऊन आपण २०१० मध्ये प्रवेश करतोय . . ३१ ला रात्री celebration करा पण जास्त जागू नका, त्यावेळी जागण्याऐवजी दुसर्यादिवशी लवकर उठून पहाटेचा प्रसन्न आणि ताजा सुर्योदय पहा . . त्यामुळे तुम्हाला मनाला समाधान मिळेल . . रात्री जागून पार्ट्या करून काय मिळते काय . . तिथे पैसे उडवण्यापेक्षा नवीन वर्षात काहीतरी नवीन कार्य करा . .
काहीजण वेगवेगळे संकल्प करतात, आणि ते बोलून दाखवतात . . खरे बोलण्याचा संकल्प, दारू न पिण्याचा, चांगले काम करण्याचा वगैरे . . पण नुसतेच संकल्प करून काय उपयोग . . तो पाळता पण आला पाहिजे . . नाहीतर तुम्ही स्वतालाच फसवत असता . . त्यामुळे असले संकल्प वगैरे करण्यापेक्षा स्वताच्या मनाशी प्रामाणिक राहून काही जमतंय का ते पहा . . ते जरी जमले तरी तुम्हाला स्वताला जिंकल्याचा आनंद होईल . . नव्या वर्षात खूप काम करा . . पण त्याचबरोबर आपल्या प्रकृतीकडे सुद्धा लक्ष द्यायला विसरू नका . . कामाबरोबर Life Enjoy करा . . मनमुराद भटका . . खूप खा, प्या (काही गोष्टी वगळून हा!) मजा करा, जे काही काम कराल ते मनापासून करा, मनाविरुद्ध नको, नवीन काही शिकायचं प्रयत्न करा.
नव्या वर्षात स्वताला शांत कसे ठेवता येईल त्याचा प्रयत्न करा, उगाच चीड-चीड नको . . कधीतरी celebration आपल्या कुटुंबासोबत करा, प्रत्येकाला आनंदी ठेवा आणि स्वतः सुद्धा आनंदी राहा . . स्वताच्या मनाला कायम ताजेतवाने ठेवायचा प्रयत्न करा . . २००९ ला मागे टाकताना त्यात केलेल्या चुका सुधारायचं प्रयत्न करा . . तुम्ही जगा आणि दुसर्यालाही जागू द्या
आणि मग पुढच्या वर्षी आजच्या दिवशी आठवून बघा . . आपण हे वर्ष किती सुंदर जगलो ते . .

आपण सर्वांना
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा . . . HAPPY NEW YEAR

चला आता आपली भेट २०१० मध्ये . . अहो म्हणजे नवीन वर्षात हा!

१२.०८.२००९

सारे जणू काही फक्त माझ्यासाठीच . . .

परवा एक दिवस रविवारी ऑफिसला काम होते म्हणून गेलो होतो, खरतर रविवारी ऑफिस नसते पण काही काम होते म्हणून गेलो होतो . . . तसे काम होते एक तासाभराचे पण त्यासाठी दुपारपासूनच बोलावले होते . . शेवटी काम काहीच झाले नाही पण त्या दिवशी रात्री उशिरापर्यंत ऑफिसमध्येच होतो . . रात्रीचे १० वाजल्यापासून ऑफिसमधून एकेक जण घरी जायला निघाला . . तसे त्यांचे काम झाले होते . . . पण आम्हा काही जणांनी दिवसभर काहीच काम केले न्हवते . . किंवा आम्हाला करायला दिलेच न्हवते मग काय दिवसभर नुसता टाइमपास आणि नेटगिरी . . .
बर ते जाऊ देत . . . त्या दिवशी रात्री २ वाजल्यावर मी आणि माझ्या २ मित्रांनी ठरवले कि आता रात्री घरी नको जायला, ऑफिस मध्येच थांबूया कारण आमचे घर ऑफिसपासून २०-२५ किलोमीटर दूर आहे आणि घरातील सगळे झोपले असतील असे समजून आम्ही ठरवले . . मग काय आम्ही ठरवतो काय आणि मला घरून फोन आला, मग म्हंटले कि घरीच जाऊन झोपू कारण दुसर्यादिवशी परत ऑफिसला यावे लागणार होते . . मग आम्ही घरी निघालो . . आम्ही हायवेवरून निघालो . . . थंडी खूप वाजत होती, नशीब त्या दिवशी स्वेटर बरोबर होता . . मधूनच एखादी गाडी जात होती . . . एवढा सुनसान हायवे प्रथमच पाहत होतो, पण खूप बरे वाटत होते . . नंतर पुढे माझे दोघे मित्र मध्येच त्यांचे घर आल्यावर गेले . . . मग काय एकटा जीव सदाशिव, चाललोय एकटाच . . . पुढे मी आमच्या सिंहगडरोड ला आलो . . . मग काय तिथे तर इतकी शांतता कि ते म्हणतात ना ' टाचणी पडली तरी आवाज यायला हवा' तशी अवस्था . . . ती शांतता पाहून असे वाटायला लागले कि मी एकटाच आहे काय या जगात . . . आणि इथले सारे काही फक्त माझ्यासाठीच आहे काय . . . . जिथे दररोज दिवसा लाखो माणसांची आपापली गडबड सुरु असते, कि त्या वातावरणाचा आपल्याला तिटकारा येतो . . . मनाला शांती हवीहवीशी वाटते मग आठवड्याच्या एका सुट्टीत कुठेतरी शांततेसाठी ठिकाणाचा शोध सुरु होतो . . . पण मी त्या रात्री जे काही अनुभवत होतो ते इतका प्रसन्न होते, कि मी एक वेळ भान विसरून गेलो . . खरच मी एक सुंदर स्वप्न पाहत असल्यासारखंच सगळा काही होते . . . तेवढ्यात मी घरापाशी आल्याच मला जाणवलं . . . आणि मी त्या सुंदर दुनियेला नजरेत साठवून आमच्या इमारतीत प्रवेश केला आणि मग ती सुंदर दुनिया नजरेत साठवत झोपी गेलो . . .

११.२५.२००९

उठा खडबडून जागे व्हा . . .

Mumbai Terror Attack - 26 Nov. 2008
गेल्यावर्षी २६ नोव्हेंबर २००८ ला आपल्या भारत देशावरील भ्याड आणि क्रूर अतिरेक्यांच्या हल्ल्याला १ वर्ष पूर्ण होत आहे, त्यानिमित्ताने त्या हल्ल्यात माझ्या शहीद पोलीस बांधवांना श्रद्धांजली म्हणून मी हा लेख लिहित आहे . . गेल्यावर्षी जो अतिरेकी हल्ला झाला तो केवळ मुंबईवरील हल्ला न्हवता, तर तो संपूर्ण भारतावर, प्रत्येक भारतीयावर आणि भारतावर प्रेम करणाऱ्यावर झालेला क्रूर हल्ला होता. पण हा हल्ला आपल्या सगळ्यांना बराच काही शिकवून गेला, आपल्या आजुबाजूंना घडणाऱ्या घटना आपल्या जीवनावर किती विपरीत परिणाम करू शकतात ते शिकवून गेला. त्या हल्ल्यात किती शूरवीर पोलिसांचे आणि जवानांचे प्राण गेले हे सर्व थांबवणे संपूर्णपणे आपल्या हातात नाही, परंतु आपण त्यासाठी प्रयत्न तर करू शकतो।
अशी घटना घडल्यावर पहिले बोट राज्यकर्त्यांवर दाखवण्यात काही जण शहाणपणा समजतात, पण ते राज्यकर्ते पण शेवटी माणूसच आहेत, आणि पोलीस सुद्धा . . ते प्रत्येक क्षणाला एवढ्या मोठ्या शहरात घडणाऱ्या प्रत्येक घटनांवर कशी की नजर ठेवणार, प्रत्येक येणाऱ्या जाणार्याची चौकशी ते करू शकतील का । .
आपण या देशाचे नागरिक आहोत तर आपली पण काही जबाबदारी आहे कि नाही. जर आपणच आपल्या जवळपास घडणाऱ्या घटनांबाबत जागरूक राहिलो तर पोलिसांचे काम सोपे नाही का होणार . . आपल्याशेजारी कोण राहत आहे . . ते काय करतात. या गोष्ठीवर तर आपण गुप्तपणे का होईना नजर ठेवू शकतो ना? का प्रत्येकावर पोलीस आणि सरकारनेच नजर ठेवायची? मान्य आहे कि आपली सरकारी धोतर काही एकदम साफ नाहीत, पण मग काय त्यावर ताशेरे ओढण्यातच धन्यता मानायची का . . आणि सरकारनेही देशाची सुरक्षा यंत्रणा अत्याधुनिक बनवणे तितकेच गरजेचे आहे. देशाचे समुद्रकिनारे सुरक्षित करणे गरजेचे आहे . . सुरक्षेच्या कामात ढिसाळपणा देशाला किती महागात पडतो हे आपण या हल्ल्यात बघितले . . . आता देशाला शक्तिशाली, सुरक्षित बनवण्याची गरज आहे, शहराच्या प्रत्येक भागात तरुणांनी एकत्र येऊन आप्तकालीन सुरक्षा गट बनवण्याची गरज आहे. त्या गटाने आप्तकालीन परिस्थितीत पोलिसांच्या मदतीने सुरक्षा आणि मदत कार्य करावे . . सर्व पोलीस ठाणी अत्याधुनिक करणे गरजेचे आहे.
प्रत्येक भारतीयाने आपल्या परीने देशाचे रक्षण करण्यात आपली छोटीशी का होईना भूमिका बजावणे गरजेचे आहे . . मग कुणाची हिम्मत होईल भारतावर असे भ्याड हल्ले करायची . . . चला तर आपण यापुढे तरी आपल्या परीने देशाचे, आणि आपल्या देशबांधवांचे रक्षण करण्यासाठी आपापल्या परीने प्रयत्न करण्याची शपथ घेवूया . . . तीच आपल्या शहीद जवानांना आणि पोलिसांना खरी श्रद्धांजली ठरेल . .

जय हिंद - जय भारत
( आपल्या देशाला सुरक्षित राष्ट्र बनवण्यासाठी काय करायला पाहिजे ते इथे आपल्या प्रतिक्रियांच्या रुपात जरूर कळवा. )

११.२२.२००९

2012-The End of The World

2012 - The End of the Worldकालच 2012-The End of The World सिनेमा पाहिला. मित्राने तिकिटे काढून ठेवली होती, म्हंटले चला तसे फुकट कोणीतरी नेतंय म्हंटल्यावर नाही कशाला म्हणायचे. तसे आजकालच्या जमान्यात कोण कोणाला फुकट नेईल ते पण सिनेमा पाहायला, छे आजकाल जेवायलासुद्धा कोणी फुकट नाही देत.
ते जाऊदेत, हा तर आपण 2012 विषयी बोलत होतो. सिनेमा चांगला होता. त्यात मानवाच्या विचारशक्तीचे आणि 3D Animation च्या किमयेचे कौतुक करावेसे वाटते. काय किमया आहे तंत्रज्ञानाची, आपण पृथ्वीचा आणि पर्यायाने जगाचा अस्त अनुभवतोय . . . आपल्याला माहित आहे कि हे सर्व प्रत्यक्षात घडू शकते पण त्याला खूप अवकाश आहे असे समजून आपण निर्धास्त जीवन जगतोय . . . तो सिनेमा पाहिल्यावर मला स्वतःचीच कीव आली . . आपण छोट्या छोट्या गोष्टीतून जगाचा विनाश जास्त जवळ आणतो आहोत . . . आपण साध्या काही नियम पाळले तर हे आपण रोखू सुद्धा शकतो . . . आपण झाडे लावू शकत नाही तर ती तोडण्याचा आपल्याला काय अधिकार ? आपणच घाणेरडे वायू कारखान्यातून बाहेर सोडतो . . . आपणच नद्या तलाव खराब करतो . . . याशिवाय अश्या अनेक गोष्टी आहेत ज्या आपण जाणून बुजून करतो . . . का करतो हे सर्व आपण, शाळेत शिकतो कचरा डब्यातच टाका . . . पण कधीकधी त्याचा पण आपण कंटाळा करतो . . . कधीकधी तर हातातला कागद रस्त्यावर सुद्धा टाकून देतो . . . का तर त्यासाठी काही कष्ट घ्यावे लागणार नसतात ना . . . एवढे स्वार्थी झालो का आपण ? जर जगबुडी झालीच तर तोपर्यंत आपण नसू सुद्धा या कल्पनेतून आपण निर्धास्त आहोत, आणि मनाला येईल तसे वागत आहोत . . . अहो पण आत्ता सुद्धा महापूर, सुनामी, भूकंप, अवकाळी पाउस यातून आपण जगबुडीची सुरुवात पाहत आहेच की . . . आता तरी जागे व्हा, हे सर्व थांबवण्यासाठी एकत्र येऊन प्रयत्न करा . . . हे लगेच शक्य नाही . . . यासाठी खूप काळ लागेल पण आपण मानवजातीचा विनाश पुढे नक्कीच ढकलू शकतो . . . विचार करा !

११.१३.२००९

स्वागतम - सुस्वागतम

श्री गणेशाय नमः
नमस्कार मित्रांनो ! मी आजपासून या ब्लॉगवाटे आपल्या भेटीला येत आहे. मी आतापर्यंत अनेक ब्लॉग वाचले, त्यावर कॉमेंटससुद्धा दिल्या. मग असे वाटले कि आपण का काही लिहित नाही, मग ठरवून टाकले कि नुसते दुसऱ्याचे ब्लॉग वाचण्यापेक्षा आपण सुद्धा काही लिहूया. पण मी काही खूप चांगला लेखक नाही, पण तरीसुद्धा काहीतरी लिहण्याचा प्रयत्न मी करणार आहे. तुम्हाला तो आवडेल अशी मी अपेक्षा करतो आणि या ब्लॉगचा श्री गणेशा करतो . . .